नवी दिल्ली- कोरोना होत असल्याच्या अफवेने कुक्कुटपालन क्षेत्राचे सुमारे १,७५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने दिलासादायक पॅकेज द्यावे, अशी मागणी कुक्कुटपालन उद्योगाकडून करण्यात आलेली आहे.
कोंबडीच्या किमती प्रति किलो १० ते ३० रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. प्रत्यक्षात चिकनची बाजारात सरासरी ८० रुपये प्रति किलो किंमत असते. समाज माध्यमातील अफवेने ग्राहकांचा विश्वास डळमळीत झाल्याचे ऑल इंडिया ब्रीडर्स असोसिएशनने (एआयपीबीए) पशुसंवर्धन मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. जानेवारीच्या तिसरा आठवडा ते फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कुक्कुटपालन करणारे शेतकरी व कुक्कुटपालन क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांचे सुमारे १,७५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रचंड नुकसान झाल्याने कुक्कुटपालन क्षेत्र दिवाळखोरीत आल्याचे एआयपीबीएचे चेअरमन बहादुर अली यांनी सांगितले.