नवी दिल्ली - कोरोनानंतरच्या जगात देशासाठी अगणित संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र, त्या संधीसाठी देशाने लाभ घ्यायला हवा. कर आणि डाटासाठी नियामक संस्थेची तत्वे निश्चित करण्याची गरज आहे, असे मत टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केले. ते फिक्कीच्या ९३ व्या वार्षिक बैठकीत बोलत होते.
प्रत्येक गावात पुरेशी बँडविथ आणि परवडणाऱ्या दरात डाटा उपलब्ध करून द्या-
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन म्हणाले, की २०२० हे वर्ष भारताशी संबंधित असावे असे वाटत असेल तर उद्योगाना धाडसी आणि भविष्यातील प्रकल्पासाठी व्हिजन ठेवावे लागणार आहे. तसेच नवीन बुद्धिमत्ता, डाटासह बँडविथ उपलब्ध करण्याची गरज आहे. उद्योग आणि सरकारमध्ये समन्वय राखण्याच्या भूमिकेवर भर द्यावा, असे वाटते. जगातील नव्या संधी घेण्यासाठी सरकारने ही भागीदारी करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावात पुरेशी बँडविथ आणि परवडणाऱ्या दरात डाटा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने खात्री द्यावी, अशी चंद्रशेखरन यांनी अपेक्षा व्यक्त केली. डाटा गोपनीयता, डाटा स्थानिक भागात ठेवणे आणि सामान्य करप्रणाली यासाठी नियामक तत्वे सरकारने स्थापन करायला हवीत.