मुंबई - 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून घोषित झालेल्या विजय मल्ल्या याला पीएमएलए न्यायालयाने दणका दिला आहे. पीएमएलए न्यायालयाने मल्ल्याची जप्त संपत्ती विकून पैसे वसूल करण्याची बँकांना परवानगी दिली आहे.
विजय मल्ल्या हा वर्ष २०१६ तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेवून विदेशात पळून गेला. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने विजय मल्ल्याला 'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित केले होते.
कर्ज वसुलीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली इतर बँकांनी विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तपास यंत्रणा ईडीकडून कुठलीही हरकत घेण्यात आली नाही. बँकांना विजय मल्ल्याची जप्त संपत्ती विकून पैसे वसूल करण्याचे परवानगी विशेष न्यायालयाने दिली आहे. या प्रकरणात मल्ल्या याला १८ जानेवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी पीएमएलए न्यायालयाने वेळ दिला आहे. विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार मल्याची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे.