नवी दिल्ली– करदात्यांचा सन्मान व सक्षमीकरण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आहे. या व्हिजनप्रमाणे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने तयार केलेल्या ‘पारदर्शी कररचनेतून प्रामाणिकतेचा सन्मान’ हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून आज लाँचिंग केले. प्रामाणिक करदात्यांचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की काही मूठ लोकांमुळे प्रामाणिक करदात्यांना त्रास होता, जुन्या करप्रणालीतल भ्रष्टाचार वाढला होता. नव्या करप्रमाणीलीमुळे करदात्यांचा सन्मान वाढला आहे. प्रामाणिक करदात्यांचे देशातील प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. उचित, तर्कसंगत व्यवहाराकडून प्राप्तिकर विभागाकडून करदात्यांना वागणूक दिली जाणार आहे.
फार कमी देशांकडून करदात्यांना सुरक्षा व सुविधा देण्यात येत आहेत. त्यामध्ये भारताचा समावेश आहे. करदात्यांच्या प्रत्येक पैशांचा वापर योग्य करण्यात येणार आहे. त्यासाठी करदात्यांनी जागरूक राहावे, अशी अपेक्षा चार्टरमध्ये करण्यात येत आहे. करदात्यांवर प्राप्तिकर विभागाला विश्वास ठेवावा लागणार आहे. पारदर्शी कररचनेतून प्रामाणिकतेचा सन्मान’ हा प्राप्तिकर भरण्याचा व देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचा आकर्षक मार्ग आहे. 130 कोटी लोकांच्या देशात केवळ दीड कोटी कर भरतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे
- नव्या प्रशासकीय मॉडेलमध्ये प्रत्येक नियम हा कायदा, लोकांवर केंद्रित व लोकांसाठी मैत्रीपूर्ण असलेले धोरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे देशात परिणाम दिसून येत आहेत.
- सुधारणांबाबत पूर्वी खूप चर्चा करण्यात येत होती. दबावातून अथवा बंधनकारक अशा घेण्यात आलेल्या निर्णयाला सुधारणा म्हटले जात होते. त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नव्हते. हा दृष्टीकोन आणि प्रयत्न दोन्ही बदलण्यात आले आहे.
- प्रामाणिक करदाता देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देतो. जर प्रामाणिक करदात्यांचे जीवन सोपे झाले तर तो प्रगती करू शकतो. त्यामधून देशाचाही विकास होतो.
- कररचना ही असामान्य, विना त्रास, प्रत्यक्ष संपर्कविरहित (फेसलेस) करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
- प्राप्तिकरबाबतचे दावे किमान 1 कोटी रुपयेपर्यंत असतील तर उच्च न्यायालयात तर 2 कोटी रुपयांपर्यंतची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत.
- प्राप्तिकर प्रकरणातील जास्तीत जास्त प्रकरणे हे ‘विवाद से विश्वास’ सारख्या योजनेतून न्यायालयाबाहेरच सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- पारदर्शक कररचनेसाठी प्लॅटफॉर्म लाँच केल्याने देशाने रचनात्मक सुधारणेसाठी नवा मैलाचा दगड आज गाठला आहे.
पारदर्शी कररचनेतून प्रामाणिकतेचा सन्मान या प्लॅटफॉर्ममधून करदात्यांना प्रत्यक्ष प्राप्तिकर कार्यालयात न जाता अथवा अधिकाऱ्यांची भेट न घेता अर्ज भरता येणार आहेत. ही सुविधा टॅक्स चार्टर योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे. तर अपील करण्याची सुविधा 25 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.