कोलकाता- व्यवस्थेमध्ये चलनाची पुरेशी तरलता असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितले. ते भारत चेंबर ऑफ कॉमर्सच्या वेबिनारमध्ये बोलत होते. व्याजदरात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महामारीमुळे अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. अर्थव्यवस्था परत रुळावर आणण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आणि सरकारने अनेक सुधारणा केल्याचे यावेळी रजनीश कुमार यांनी सांगितले.
आरबीआयने व्यवस्थेमध्ये पुरेशी चलनाची तरलता असण्यासाठी त्वरित लवचिकपणे आणि खात्रीशीर प्रतिसाद दिल्याची त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण, एमएसएमई उद्योगांना मदत करण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. कृषी, संरक्षण व खाणकाम यामध्ये सुधारणा करून गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार केले आहे.
मला विश्वास आहे की, स्थिती सामान्य होत आहे. अनेक उद्योग त्यांच्या 70 ते 80 टक्के क्षमतेने काम करत आहेत. तर काही उद्योगांनी त्यांची निर्यातही सुरू केली आहे.
त्यांच्या मते ग्रामीण अर्थव्यवस्था ही पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडते.
कोरोना महामारीचा विमान वाहतूक सेवा, पर्यटन, आदरातिथ्य, सेवा आणि बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. तर कृषी क्षेत्रावर सर्वात कमी परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.