नवी दिल्ली- तेल इंधनाचे दर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) किरकोळ विक्रीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ५ पैशांनी वाढविले आहेत.
तेल विपणन कंपन्यांनी विमान इंधनाचे दर प्रति किलो लिटर १ हजार ५०० रुपयांनी कमी केले आहेत. तर विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस आणि ऑटो गॅसचे दर मागील महिन्याप्रमाणे स्थिर ठेवले आहेत. पेट्रोलचे दर ५ पैशांनी वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८२. ०८ आहे. तर डिझेलचा दर ३० जुलैनंतर स्थिर राहिला आहे.
दिल्लीत विमान इंधनाचा दर प्रति किलो लिटर १ ऑगस्टला ४३ हजार ९३३.५३ रुपये होता. तर १ सप्टेंबरला विमान इंधनाचा दर हा ४२ हजार ४४७.९१ रुपये आहे. कोरोना महामारीत कमी क्षमतेने विमान कंपन्यांची सेवा सुरू आहे. विमान इंधनाचे दर कमी झाल्याने विमान कंपन्यांच्या नुकसानात घसरण होणार आहे.
विनाअनुदानित स्वयंपाकाच्या गॅसचा दर हा प्रति १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ५९४ रुपये आहे. मागील महिन्यातही १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी हाच दर होता. त्यामुळे सरकारला थेट लाभ हस्तांतरणासाठी ग्राहकांना वाढीव अनुदान द्यावे लागणार नाही.