नवी दिल्ली- सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मार्चमध्ये सलग २४ दिवस इंधनाचे दर स्थिर राहिल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर आज कमी झाले आहेत.
पेट्रोलचे दर दिल्लीत प्रति लिटर २१ पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर २० पैशांनी गुरुवारी कमी झाले आहेत. या दर कपातीनंतर पेट्रोलचा दर प्रति लिटर ९०.७८ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ८१.१० रुपये आहे. व्हॅटप्रमाणे राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर भिन्न आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर २१ पैसे, कोलकात्यात दर २० पैशांनी तर चेन्नईत १८ पैशांनी कमी झाले आहेत. डिझेलचे दर मुंबईत प्रति लिटर १९ पैसे, कोलकात्यात २० पैसे तर चेन्नईत २२ पैशांनी कमी झाले आहेत.
हेही वाचा-'सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू'
- मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७.१९ रुपये आहे. डिझेलचा दर मुंबईत ८८.२० रुपये आहे. देशातील काही राज्यांमध्ये प्रिमियम पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक आहेत. इंधनाचे दर कमी केल्याने प्रिमियम पेट्रोलचे दर १०० रुपयांहून कमी होण्याची शक्यता आहे.
- फेब्रुवारीच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७ डॉलरने वाढले होते. या दरवाढीमुळे फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर १४ वेळा वाढविण्यात आले होते. या दरवाढीनंतर पेट्रोलचे दर दिल्लीत प्रति लिटर ४.२२ रुपयांनी तर डिझेलचे दर ४.३४ रुपयांनी वाढले आहेत.
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या आठ दिवसामध्ये ९ टक्क्यांनी घसरले आहेत. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ६३.५ डॉलर आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले तर पुन्हा इंधनाचे दर वाढू शकतात, असे सरकारी तेल कंपनीमधील अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा-घसरणीचा फटका; दोन दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांचे ७ लाख कोटी पाण्यात!