हैदराबाद - व्हॉट्सअॅपवरून आपण फोटो, व्हिडिओ पाठवण्याची सोय होती. आता व्हॉट्सअॅपवरूनही पैसे पाठवण्याची सुविधा निर्माण झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) व्हॉट्सअॅपला युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वापराची परवानगी दिली आहे. पेटीएम आणि मोबीक्विक प्रमाणेच व्हॉट्सअॅपवरूनही ग्राहक आर्थिक देवाण-घेवाण करू शकणार आहेत. यात विशेष म्हणजे, व्हॉट्सअॅपवर कुठलेही शुल्क आकारणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप आता पेटीएम व इतर अॅपला टक्कर देऊ शकते.
व्हॉट्सअॅपचे भारतामध्ये सर्वांत जास्त युजर्स आहेत. त्यामुळे जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपच्या सुविधेमुळे कॅशलेस व्यवहारांना आणखी बळ मिळण्याची चिन्हं आहेत. तसेच प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक आणि चांगल्या ऑफरमुळे, गुगल पे लोकप्रिय ठरतंय. त्यामुळे 'गुगल-पे' ला तगडा प्रतिस्पर्धी व्हॉट्सअॅप ठरणार आहे.