नवी दिल्ली - गुगलच्या प्ले स्टोअरमधून अॅप हटविल्यानंतर पेटीएमने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेटीएमने स्वत:चे अँड्राईड मिनी अॅप स्टोअर लाँच केले आहे. या स्टोअरमधून देशातील डेव्हलपरच्या नवीन उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
मिनी अॅप स्टोअरवर अॅपची नोंदणीकृत आणि वितरण करण्यासाठी पेटीएम डेव्हलपरकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. तर, डेव्हलपरला पैसे घेण्यासाठी अथवा देण्यासाठी पेटीएम वॉलेट, पेटीएम पेमेंट बँक, यूपीआय, नेट बँकिंग आणि कार्डचा पर्याय उपलब्ध आहे.
पेटीएमच्या स्टोअरमध्ये ओला, पार्क प्लस, रॅपिडो, नेटमेड्स, १ एमजी, डोमिनोज पिझ्झा, फ्रेश मेन्यू, नोब्रोकर हे सेवा पुरवठादार आधीच सहभागी झाले आहेत. याबाबत माहिती देताना पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले की, पेटीएम मिनी अॅप स्टोअर हे तरुण, भारतीय डेव्हलपरचे सक्षमीकरण करणार आहे. पेटीएमच्या वापरकर्त्याला इतर अॅप स्वतंत्रपणे डाऊलोड करण्याची गरज भासणार नाही.