नवी दिल्ली- वाहन उद्योगातील मंदी सलग १० व्या महिन्यातही सुरुच आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ३१.५७ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये २ लाख ८७ हजार १९८ वाहनांची विक्री झाली होती. चालू वर्षात ऑगस्टमध्ये १ लाख ९६ हजार ५२४ वाहनांची विक्री झाली आहे.
देशातील कारच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ४१.०९ टक्क्यांची घसरण झाली आहे. गतवर्षी ऑगस्टमध्ये देशात १ लाख ९६ हजार ८४७ कारची विक्री झाली होती. चालू वर्षात ऑगस्टमध्ये कारची विक्री कमी होवून १ लाख १५ हजार ९५७ कारची विक्री झाली आहे. ही आकडेवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) सोमवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा-दूरसंचार, वाहन उद्योग आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत घट
दुचाकींच्या विक्रीत गेल्या महिन्यात २२.३३ टक्के घसरण झाली होती. हे प्रमाण गतवर्षी ऑगस्टमध्ये १२ लाख ७ हजार ५ असताना यंदा ९ लाख ३७ हजार ४८६ झाले आहे. सर्व प्रकारच्या दुचाकींच्या विक्रीत ऑगस्टमध्ये २२.२४ टक्के घसरण झाली. चालू वर्षात सर्व प्रकारातील दुचाकींच्या विक्री १५ लाख १४ हजार १९६ एवढी झाली आहे. गतवर्षी १९ लाख ४७ हजार ३०४ दुचाकींची विक्री झाली होती.