परभणी – मराठवाडयात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, लहरी मान्सूनमुळे शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान सहन करावे लागते. ही अडचण लक्षात घेवून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पेरणीसह फवारणी आणि रासणी यंत्र विकसीत केले आहे. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केला.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पाच फणी रुंद सरी वरंबा (बीबीएफ) यंत्राचे प्रात्याक्षिक पोकरा प्रकल्प, कृषि विभाग यांच्या पुढाकाराने साळापुरी येथे शेतकऱ्यांच्या शेतात शनिवारी दाखविण्यात आले. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले की, बीबीएफ यंत्र शेतक-यांना व्यवसायिकदृष्टया उपलब्ध करण्याकरिता विद्यापीठाने पुणे येथील रोहीत कृषी इंडस्ट्रिजसोबत सामंजस्य करार केला आहे. पुढील काही वर्षात बीबीएफ पध्दतीने सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढविण्याचे कृषि विभाग व विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. तर बीबीएफ यंत्राबाबत प्रात्यक्षिकास कृषि अभियंता डॉ. सोळंळी यांनी माहिती दिली.
हे आहेत बीबीएफ यंत्राचे फायदे
- यंत्राव्दारे पेरणी सोबतच तणनाशक फवारता येते.
- पध्दतीमुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते.
- जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकाला, तसेच पुढील हंगामातील पिकांना लाभ होतो.
- गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहुन पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते.
- पिकांची वाढ जोमदारपणे होते. या यंत्राने चार कामे एकाच वेळेस होत असल्याने ट्रॅक्टरच्या सतत शेतामध्ये जाण्यामुळे माती दबण्याचे प्रमाण कमी होईल.