कर्नाटक - कर्नाटकामधील श्री गुरू राघवेंद्र सहकारी बँकेला आर्थिक व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे बंगळुरुमधील बँकेबाहेर ठेवीदारांची रांग लागली आहे. आरबीआयच्या निर्बंधामुळे ठेवीदारांना जास्तीत जास्त ३५ हजार रुपयेच खात्यामधून काढता येतात.
श्री गुरू राघवेंद्र सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. मात्र, बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँकेवर व्यवहार करण्यासाठी बंधने लागू असणार असल्याचे केंद्रीय मध्यवर्ती बँकेने आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराचा विक्रमी निर्देशांक; गाठला ४१,९०० चा टप्पा
राघवेंद्र सहकार बँकेचे चेअरमन के. रामकृष्ण यांनी ठेवीदारांचे पैसे १०० टक्के सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. ही माझी जबाबदारी आहे. येत्या १९ जानेवारीला सविस्तर माहिती आणि आकडेवारीसहित बँक ग्राहकांना भेटणार असल्याची माहिती रामकृष्ण यांनी दिली. दुसरीकडे ठेवीदारांनी पैशाची मागणी लावून धरली आहे. हजारो बँक ग्राहकांनी पोलीस स्टेशनमध्ये जावून रामकृष्ण यांच्याविरोधात तक्रार देण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा- अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करा, वाणिज्य मंत्रालयाचा प्रस्ताव
ग्राहकांना मदत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केल्याचा दावा दक्षिण बंगळुरूचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी केला. ग्राहकांनी चिंता करू नये, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.