नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सरकारी बँकांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बिगर बँकिंग वित्तीय संस्था आणि एमएसएमई क्षेत्राला पुरेसा वित्तपुरवठा करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
विविध सरकारी बँकांनी १ ऑक्टोबरपासून ८ दिवसांच्या कर्ज मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामधून ग्राहकांना ८१ हजार ७८१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केल्याचे केंद्रीय वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले. यामधील नवीन कर्ज प्रकरणाची रक्कम ही ३४ हजार ३४२ कोटी रुपये एवढी आहे.
हेही वाचा-सणासुदीला बँका देशभरातील २५० जिल्ह्यात भरविणार 'कर्ज मेळावे'
बँकांकडे पुरेसा वित्तपुरवठा असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, एमएसएमई क्षेत्राला पुरेसा वित्तपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या क्षेत्रातील विविध कंत्राटदार आणि उद्योगांचे विविध सरकारी विभागांकडे ४० हजार कोटी रुपये थकित आहेत. ही रक्कम दिवाळीच्या तोंडावर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा-खूशखबर! स्टेट बँकेचे कर्ज स्वस्त; सहाव्यांदा एमसीएलआरमध्ये १० बेसिस पाँईटने कपात
देशात पहिल्या टप्प्यातील कर्ज मेळावे हे ७ ऑक्टोबरला पार पडले आहेत. यामधून कृषी, वाहन, गृह, एमएसएमई, शिक्षण आणि वैयक्तिक कर्जांचे वाटप करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील कर्ज मेळावे हे देशातील २०९ जिल्ह्यांत २१ ते २५ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येणार आहेत.