नवी दिल्ली- सणाच्या तोंडावरच कांद्याच्या वाढलेल्या दराने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. अशातच कांद्यापाठोपाठ टोमॅटोचेही दर देशभरात वाढत आहेत. गेल्या काही आठवड्यापासून टोमॅटोचे दर राजधानीत सुमारे ७० टक्क्यांनी वाढले आहेत. येत्या काही दिवसात टोमॅटोचे दर आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तरेकडील राज्यात पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत कांद्याचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. गेली काही दिवस दिल्लीमधील किरकोळ बाजारात प्रति किलो ४० ते ६० रुपये दराने टॉमॅटोची विक्री होत आहे. नोएडामध्ये राहणाऱ्या मंजू सिंह यांनी सांगितले, की टोमॅटो व कांद्याचे दर खूप वाढल्याने स्वयंपाकघराच्या खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. साधारणत: दिल्लीमध्ये टोमॅटोला प्रति किलो ३० रुपये भाव असतो. सध्या, टोमॅटोला ४० ते ६० रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. टोमॅटोचे भाव फक्त दिल्लीतच नव्हे देशभरात वाढत आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाईटनुसार चंदीगडमध्ये बुधवारी कांद्याचा भाव प्रति किलो ५२ रुपये होता.
हेही वाचा-कच्च्या तेलाचे दर एक दिवसच राहिले स्थिर; ग्राहकांना दरवाढीची पुन्हा झळ
चांगल्या दर्जाच्या टोमॅटोला प्रति २५ किलोला मिळाला ८०० रुपये भाव-
दिल्लीच्या आझादपूर येथील घाऊक भाजीमंडईत चांगल्या प्रतीच्या २५ किलो टॉमेटोला सरासरी ८०० रुपये भाव मिळाला. साधारण दर्जा असलेला टोमॅटोच्या प्रति पोत्याला ५०० रुपये भाव मिळाला. आझादपूर कृषीउत्पन्न बाजार समितीच्या भावफलकानुसार घाऊक खरेदीत टोमॅटोला प्रति किलो ८ रुपये ते ३४ रुपये भाव मिळाला. या बाजार समितीमध्ये टोमॅटोची ५६०.३ टन बुधवारी आवक झाली.