बार्सेलोना - भारतात मोबाईलच्या बाजारपेठेत कधीकाळी वर्चस्व असणारी नोकिया पुन्हा एकदा मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. येत्या तीन ते पाच वर्षात भारतात पहिल्या तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नोकियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्राहकांची मागणी आणि बाजारपेठच्या प्रतिसादानंतर नोकिया नवी उत्पादन तयार करत असल्याचे नोकियाचे एचएमडी ग्लोबल हेडचे भारतीय प्रमुख अजय मेहता यांनी सांगितले. देशात पहिल्या तीनमध्ये येण्यासाठी आमचे व्यवस्थिरीत्या प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ग्राहकांना जसा अनुभव घ्यायचा असतो, त्याप्रमाणे उत्पादने तयार करत असल्याचे मेहता यांनी सांगितले. छायाचित्रांवर लक्ष केंद्रीत करणारे मॉडेल सादर केल्याचीही त्यांनी माहिती दिली.
नोकियाच्या चार मॉडेलचा शुभारंभ-
नोकियाने रविवारी मोबाईलच्या चार मॉडेलच्या शुभारंभ केला. यामध्ये पाच कॅमेरे असलेला प्रिमियममधील नोकिया ९ प्युरव्ह्युव हा आहे. या मोबाईलची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे.
कंपनी ४.२ मोबाईल (किंमत - १२ ते १५ हजार रुपये ) , नोकिया ३.२ ( १० हजार ते १२ हजार रुपये ) मोबाईल, नोकिया १ प्लसचा (७ हजार रुपये ) शुभारंभ केला आहे. नोकिया २१० हे मॉडेलही ३ हजार ५०० रुपये किंमत असलेल्या मॉडेलचा शुभारंभ केला आहे. दुसऱ्या तिमाहीदरम्यान या नोकिया मॉडेलची विक्री सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जेव्हा मोबाईलची सुरुवात झाली तेव्हा नोकियाचे भारतीय बाजारपेठेवर सात-आठ वर्षे वर्चस्व होते. त्यानंतर सॅमसंगच्या मोबाईलची सुरुवात झाल्यानंतर नोकियाचा बाजारपेठेवरील प्रभाव कमी झाला. तसेच चिनी कंपन्यांच्या स्वस्तामधील मोबाईलमुळेही नोकियाची मागणी कमी झाली.
चिनी कंपन्यांचे भारतीय मोबाईल बाजारपेठेवर वर्चस्व आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मेहता म्हणाले, की कंपनी ही ग्राहकांना उत्पादनातून चांगला अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. आम्ही किमतीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. मात्र ज्या किमतीमध्ये मोबाईल विकत होतो त्याचा दर्जा देणार आहोत. नोकियाचे बहुतेक सर्व मोबाईल भारतामध्ये तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.