नवी दिल्ली- दुर्गा पूजा समित्यांना प्राप्तिकर विभागाकडून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. मात्र प्राप्तिकर विभागाकडून नुकतेच कोणत्याही नोटीस पाठविल्या नसल्याचा खुलासा सीबीडीटीने केला आहे.
दुर्गा पूजा समित्यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठविल्या नाहीत - सीबीडीटीचा खुलासा
पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा समित्यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठविल्याचे वृत्त काही माध्यमात आले होते. ते वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे.
पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजा समित्यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठविल्याचे वृत्त काही माध्यमात आले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) ते वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र पुजा समित्यांसाठी काम करणाऱ्या अनेक कंत्राटदारांनी प्राप्तिकर भरलेला नसल्याचे सीबीडीटीने म्हटले. त्यामुळे त्यांना डिसेंबर २०१८ ला नोटीस पाठविली होती. त्यामध्ये सुमारे ३० कंत्राटदारांचा समावेश आहे. नोटीसमध्ये कंत्राटदार आणि इव्हेंट मॅनेजर यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती मागविण्यात आली आहे. त्याशिवाय टीडीएसची माहिती मागविली आहे. हे नेहमीची टीडीएस विभागाची प्रक्रिया असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.
अनेक दुर्गा पूजा समित्यांनी नियमांचे पालन करत कर वजावटीची माहिती दिली आहे. तर काही पूजा समित्यांनी टीडीएसची माहिती देण्यासाठी माहितीपर कार्यक्रम घेण्याचीही विभागाला विनंती केली होती. त्यानंतर विभागाने १६ जुलै, २०१९ ला माहितीपर कार्यक्रम घेतल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.