हैदराबाद– खासगी संस्थेत शिकवणी (कोचिंग) लावणाऱ्या विद्यार्थ्यांना आंध्रप्रदेशच्या ऑथिरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगच्या (एएआर) खंडपीठाकडून दिलासा मिळू शकला नाही. शिकवणीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच 18 टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) द्यावा लागणार आहे.
आंधप्रदेशमधील गुंटूरच्या मास्टर माईंड या शैक्षणिक संस्थेने आंध्रप्रदेशच्या एएआरकडे शैक्षणिक सेवांना 18 टक्के जीएसटीमधून वगळण्याची अर्जाद्वारे विनंती केली. या संस्थेमधून विद्यार्थ्यांची सीए, कॉस्ट आणि वर्क्स अकाउंटन्सी सर्टिफिटेकेटच्या (आयसीडब्ल्यूए) परीक्षेची तयारी करून घेतली जाते. कोचिंग सेंटर या जीएसटीमधून सवलत मिळविण्यासाठी पात्र नसल्याचे आंध्रप्रदेशच्या एएआरने संस्थेचा अर्ज निकाली काढताना म्हटले आहे.
या कारणाने फेटाळला अर्ज-
कोचिंग सेंटर अथवा प्रशिक्षण केंद्र हे आयसीएआय अथवा आयसीडब्ल्यूएआयचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कायद्याने बंधनकारक नाही. तसेच या शैक्षणिक संस्थांनी तयार केलेला अभ्यासक्रम अथवा प्रमाणपत्र हे कायद्याप्रमाणे वैध नाही. त्यांचाही अभ्यासक्रम हा एकसारखा नाही. विविध प्रशिक्षण केंद्रातून देण्यात येणारे शैक्षणिक शुल्क वेगवेगळे आहे, असे ऑथिरिटी फॉर अॅडव्हान्स रुलिंगने म्हटले आहे.
यांना 18 टक्के जीएसटीमधून वगळले आहे..
जीएसटीच्या कररचनेत प्राथमिक शिक्षण ते उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक सेवांना सवलत दिली आहे. तसेच कायद्याने बंधनकारक असलेल्या काही अभ्यासक्रम आणि व्होकेशनल कोर्सेसलाही 18 टक्के जीएसटीमधून सवलत देण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांना सेवा देणाऱ्या कँटीन, दुरुस्ती आणि देखभाल अशा सुविधांवरही 18 टक्के जीएसटी लागू करण्यात येतो.
दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्राच्या एएआर खंडपीठानेही कोचिंग सेंटरला 18 टक्के जीएसटी भरावी लागणार असल्याचे 2018 मध्ये स्पष्ट केले होते.