नवी दिल्ली- गरीब रथ एक्सप्रेस रेल्वे बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. त्याबाबतचे वृत्त हे रेल्वे मंत्रालयाने फेटाळून लावले आहे.
रेल्वेकडून देशात गरीब रथ रेल्वेच्या २६ सेवा सुरू आहेत. या सेवेमधून नागरिकांना वातानुकुलित रेल्वे प्रवास करता येतो. त्यासाठी एसी-३ श्रेणीहून कमी दर आकारण्यात येतात.
उत्तर रेल्वेकडे सध्या रेल्वे कोच कमी असल्याची, मात्र तात्पुरती समस्या आहे. तर गरीब रथाच्या दोन सेवा या एक्सप्रेस म्हणून चालविण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. यामध्ये काथगोदाम-जम्मू तावी आणि कानपूर-काथगोदाम या रेल्वे सेवांचा समावेश आहे. असे असले तरी या दोन्ही रेल्वे सेवा ४ ऑगस्टपासून पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.
एसी रेल्वे कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी गरीब रथ रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या प्रवाशांना देखील वातानुकुलित रेल्वे प्रवासाचा लाभ घेणे शक्य होत आहे.