नवी दिल्ली- तुम्ही जर पेट्रोल-डिझेलच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेलची खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास सवलत देण्यात येते. ही सवलत आजपासून बंद करण्याचा निर्णय सरकारी तेल कंपन्यांनी घेतला आहे.
केंद्र सरकारने अडीच वर्षांपूर्वी क्रेडिट कार्डचा वापर करून इंधन खरेदी करणाऱ्यांना सवलत जाहीर केली होती. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी सरकारने ही सवलत जाहीर केली होती.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्डधारकांना सवलत बंद केल्याचे एसएमएसद्वारे कळविले आहे. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांना ०.७५ टक्के क्रेडिट कार्डच्या वापरावर सवलत देण्याची सूचना केली होती. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांकडून गेली अडीच वर्षे डेबिट व क्रेडिट कार्डचा वापर केल्यास पेट्रोल पंपावर सवलत देण्यात येत होती. कार्डच्या वापरासाठी लागणारे शुल्क (एमडीआर) हे सरकारी तेल कंपन्यांनीच देण्याचे आदेशही सरकारने दिले होते. साधारणत: हे शुल्क विक्रेत्यांकडून बँकांना दिले जाते.
हेही वाचा-कच्च्या तेलाचे दर वाढूनही ग्राहकांवर फारसा बोझा पडू दिला जाणार नाही, कारण...