नवी दिल्ली – जग कोरोनाच्या संकटापुढे झुंजत असताना सायबर हल्ल्याचे संकट भेडसावू लागले आहे. उत्तर कोरियाच्या सरकारचा पाठिंबा असलेले हॅकर हे भारतासह सहा देशांवर 21 जूनला मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोरोनाची संकल्पना असलेली फिशिंग मोहिम हॅकर राबविणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
लॅझारस ग्रुपकडून सहा देशातील व्यावसायिक, लघू आणि मोठ्या उद्योजकांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जपान, भारत, सिंगापूर, दक्षिण कोरिया, इंग्लंड आणि अमेरिका असल्याचे झेडनेटने अहवालात म्हटले आहे. या मोहिमेमधून उत्तर कोरियाच्या हॅकर गटाला आर्थिक लाभ मिळवायचा आहे. त्यासाठी काही फसवणुकीच्या वेबसाईटवर जावून लिंक करण्याची सूचना केली जावू शकते. त्यांच्याकडून वैयक्तिक व वित्तीय माहिती मागविली जावू शकते, असे सिंगापूर येथे मुख्यालय असलेल्या सायबर सुरक्षा सायफिर्मा कंपनीने म्हटले आहे.
हॅकर गटाने जपानमधील 11 लाख व्यक्तींची माहिती आणि ईमेलआयडी मिळविल्याचा दावा केला आहे. तर भारतामधील 20 लाख आणि इंग्लंडमधील 1 लाख 80 हजार व्यावसायिकांची माहिती मिळविल्याचा दावाही हॅकर गटाने केला होता. सिंगापूरमधील 8 हजार संस्थांना हॅकर गट लक्ष्य करणार असल्याचे सिंगापूर बिझनेस फेडरेशनने म्हटले आहे.