नवी दिल्ली– सरकारची 'थिंक टँक' असलेल्या नीती आयोगाने स्थलांतरित मजुरांना नोकऱ्या देणाऱ्यासाठी वेबसाईट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नीती आयोगाने गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि टेक महिंद्राच्या अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.
टाळेबंदीत अनेक स्थलांतरित मजुरांना नोकऱ्या व रोजगार गमवावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर कुशल-अकुशल मजुरांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाजवळ नोकरी देण्यासाठी वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. मजुरांना ही वेबसाईट विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उद्योगातील सूत्राने सांगितले.
ही वेबसाईट नोकरी शोधणारे व रोजगार देणारे, सरकारी संस्था, कौशल्य केंद्रे आणि बाह्य भागीदारांना जोडण्याचे काम करणार आहे. त्यासाठी मशिन लर्निंग आणि कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. हे पोर्टल कमी किमतीमधील मोबाईलवरही (फीचर फोन) चालू शकणार आहे.