नवी दिल्ली - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) राष्ट्रीय महामार्गावर १०० टक्के रोकडविरहित टोल संकलन सुरू झाल्याचे सांगितले. टोलनाक्यांवर फास्टॅग बंधनकारक करण्यात आल्याने हा परिणाम दिसून आला आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) फास्टॅग वापरण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. १५ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून देशात फास्टॅग बंधनकारक करण्यात आल्याचे म्हटले आहे.
काय म्हटले आहे प्राधिकरणाने?
- वाहनचालकांनी फास्टॅगला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने १०० टक्के रोकडविरहित टोल संकलन झाले आहे.
- गेल्या दोन दिवसांत २.५ लाख फास्टॅगची विक्रमी विक्री झाली आहे.
- १७ फेब्रुवारीला फास्टॅगमधून ९५ कोटी रुपयांचे विक्रमी टोल संकलन झाले आहे.
- फास्टॅगचा वापर हा ८७ टक्क्यांपर्यत पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांत फास्टॅगचा वापर ७ टक्क्यांनी वाढला आहे.
- फास्टॅगची सुविधा मिळण्यासाठी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने १ मार्च २०२१ पर्यंत मोफत फास्टॅग मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
- देशातील ७७० टोलनाक्यावर टॅगवरील १०० रुपये शुल्क माफ करण्यात आले आहे.
- वाहनचालकांना जमा रकमेची माहिती कळण्यासाठी माय फास्टॅग अॅपमध्ये नवीन वैशिष्ट्य दिल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले आहे.