नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर राजकीय पक्ष जाहीरनामा करण्यास सुरुवात करतात. भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आपल्या उद्योगाबाबतच्या मागण्या जाहिरनाम्यासाठी सुचविल्या आहेत. यामध्ये कॉर्पोरेट कर १८ टक्क्यापर्यंत कमी करणे व आरोग्यासह शिक्षणावरील खर्चात वाढ करणे या मागण्या आहेत. सध्या २५० कोटीपर्यंतची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांवर २५ टक्के कॉर्पोरेट कर लावण्यात येतो. तर २५० कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांवर ३० टक्के कॉर्पोरेट कर लावण्यात येतो.
देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या ३ टक्के खर्च हा आरोग्यावर करण्यात यावा, असे सीआयआयने जाहिरनाम्यासाठी सुचविले आहे. आरोग्यक्षेत्राला पायाभूत क्षेत्राप्रमाणे पाहिले जावे. माता आणि नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्याला प्राधान्य देण्याची गरज सीआयआयच्या शिफारसीत व्यक्त केली आहे. तर शिक्षणावरील खर्च एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या ६ टक्के करावा, असे सीआयआयने म्हटले आहे.
या आहेत शैक्षणिक शिफारसी-
- अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
- चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहनपर भत्ता
- विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्ये डिजिटलायझेशनची पायभूत सुविधा