नवी दिल्ली - केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरीविरोधी असल्याची विरोधी पक्षासह शेतकरीवर्गातून टीका होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने (एनडीए) भारताचे पहिले व्यापक कृषी निर्यात धोरण मंजूर केले आहे. या धोरणाचा उद्देश हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आहे.
सध्याची कृषी निर्यात ही २०२२ पर्यंत ३०००कोटी डॉलरवरून ६००० कोटी डॉलर करणे आहे. सध्या कृषी क्षेत्रातील संकट पाहता हे उद्दिष्ट महत्त्वाकांक्षी असल्याचे दिसत आहे. तरीही सरकारने प्रथमच राष्ट्रीय कृषी धोरण तयार केले असल्याने त्याचे स्वागत होत आहे.
ही आहेत राष्ट्रीय कृषी निर्यात धोरणाची उद्दिष्टे-
कृषी निर्यात धोरणातून शेतकऱ्यांनी आधुनिक आणि व्यावसायिक व्यापाराप्रमाणे प्रक्रिया कराव्यात, हा हेतू आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे आणि स्थानिक व्यापारातून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळावे हा धोरणाचा उद्देश्य आहे.
धोरणांचे फायदे-
कृषी इकोसिस्टिममधील पायाभूत दरी दूर करण्यासाठी कृषी निर्यात धोरणाचा अवलंब केला जाणार आहे. यातून शेतकऱ्यांनाच नव्हे तर स्थानिक ग्रामीण भागाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. दर्जेदार कृषी उत्पादनांचा विकास, उत्पादनामध्ये विविधता आणण्यासाठी प्रोत्साहन, कृषीउद्योग विकसित करणे आणि कृषी व्यवसायात स्थानिक शेतकऱ्यांना अधिकाधिक सहभागी करणे हादेखील धोरणाचा उद्देश आहे.