मुंबई- तुम्ही हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार जर पक्का केला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एक रुपयाही मुद्रांक शुल्क न भरता तुम्हाला घर खरेदी करता येणार आहे. ही योजना बांधकाम व्यावसायिक संघटना नरेडेकोने (NAREDCO) जाहीर केली आहे.
राज्य सरकारने मुद्रांक शुल्क 31 डिसेंबरपर्यंत 2 टक्के केले आहे. नरेडेकोच्या ठराविक प्रकल्पात घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुद्रांक शुल्कावर पूर्णतः सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना भरावा लागणाऱ्या 2 टक्के मुद्रांक शुल्काची रक्कम नरेडेकोच भरणार आहे.
कोरोना आणि टाळेबंदीने बांधकाम व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. घर खरेदी-विक्रीत मोठी घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायाला आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत 5 टक्क्यांऐवजी 2 टक्के मुद्रांक शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत 5 टक्क्यांऐवजी 3 टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हा निर्णय दिलासा देणारा असतानाचे ग्राहकांना मोठ्या संख्येने प्रकल्पाकडे आकर्षित करण्यासाठी बिल्डरांची आघाडीची नरेडेको संघटना पुढे सरसावली आहे.