मुंबई -सरकारी बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणीत वाढ झाली आहे. मोदीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुंबईमधील विशेष न्यायालयाने दिले आहेत.
विशेष न्यायालयाने नीरव मोदी आणि त्याची बहिण पुर्वी मेहता यांना नोटीस बजावली आहे. मोदी आणि त्याची बहिण यांना मालमत्ता का जप्त करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही विशेष न्यायालयाने बजाविली आहे. मोदीच्या कंपन्यांचा मनी लाँड्रिग प्रकरणात समावेश असल्याने सक्त अंमलबजावणी संचालनालयाने २०१८ मध्ये नोटीस बजाविली होती. साडेतीन वर्षानंतर नीरव मोदी, त्याचे कुटुंबिय सदस्य, मामा मेहुल चोक्सी आणि इतरांची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा-फरार हिरा व्यापारी नीरव मोदीच्या बहिण आणि मेहुण्याविरूद्ध जारी वॉरंट कोर्टाने नाकारला
पीएनबीची १४ हजार कोटींची फसवणूक
मोदी-चोक्सी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेची १४ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने मोदी आणि चोक्सी यांच्याविरोधात जानेवारी २०१८ मध्ये फसवणुकीची तक्रार केली होती. मात्र, त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि इतर आरोपी हे विदेश पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्याविरोधात सीबीआय आणि ईडीकडून स्वतंत्र चौकशी केली आहे.
हेही वाचा-नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी दिली परवानगी
मोदी-चोक्सीकडून पैसे वसूल करण्यात तपास संस्था अपयशी-
गेल्या काही वर्षात सीबीआय आणि ईडीली मोदी-चोक्सी यांच्या मालमत्तेचा लिलाव करूनही अत्यंत कमी रक्कम वसूल करण्यात यश मिळाले आहे. तपास संस्थांनी सहा लक्झरी वाहने, डिझायनर बॅग्स, महागडी मनगटी घड्याळे, दुर्मीळ पेटिंग्ज इतर मालमत्ता विकली आहे. तर अलिबाग येथील नीरव मोदीचा बंगला मार्च २०१९ मध्ये जमीनदोस्त करण्यात आला आहे.
दरम्यान, लंडनमध्ये पळून गेलेल्या नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला २५ फेब्रुवारीला तेथील न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र, मोदीने पुन्हा प्रत्यार्पणाविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे.