मुंबई - केंद्र सरकारने साखरेच्या किमान आधारभूत किमतीत प्रती किलो २ रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने साखर कारखान्यांच्या नफ्यात ६ टक्के वाढ होणार असल्याचे पतमानांकन संस्था इक्राने (आयसीआरए) म्हटले आहे.
किमान आधारभूत किमत वाढविण्याचा निर्णय हा साखर कारखान्यांसाठी सकारात्मक आहे. साखर कारखाना चालविण्याच्या प्रक्रियेत मार्जिनमध्ये वाढ होणार असुन त्यातून कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित पैसे देणे शक्य होणार असल्याचे इक्राने म्हटले आहे.
किमान आधारभूत किंमत वाढविल्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. मात्र किमती नियंत्रणात ठेवणे सरकारसाठी कठीण ठरणार असल्याचेही इक्राचे उपाध्यक्ष सब्यासची मुजुमदार यांनी म्हटले.
२०१८-२०१९ या वर्षात साखरेचे उत्पादन हे ३०.७ मिलियन टन असणार आहे. यापूर्वी साखरेचे उत्पादन हे ३१.५ मिलियन टन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.