नवी दिल्ली - अमूलने नुकतेच दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयाने वाढ केली आहे. यानंतर मदर डेअरीकडूनही ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. मदर डेअरीने प्रतिलिटर २ रुपयाची दरवाढ आजपासून लागू केली आहे.
मदर डेअरी ही नवी दिल्लीमधील ग्राहकांना दुधाचा पुरवठा करणारी आघाडीची कंपनी आहे. गेल्या दोन वर्षात प्रथमच मदर डेअरीने दरवाढ केली आहे. ही दरवाढ फक्त पॅक असलेल्या दुधासाठी आहे. खुल्या दुधाच्या विक्रीसाठी (टोकन मिल्क) दरवाढ करण्यात आली नाही.
१ लिटर दुधाचे दर १ रुपयाने तर अर्ध्या लिटर दुधाचा दर २ रुपयाने वाढविण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहकांना केवळ १ रुपयाची दरवाढ सोसावी लागणार असल्याचे मदर डेअरीने म्हटले आहे. मदर डेअरीकडून नवी दिल्लीत ३० लाख लिटरहून अधिक दुधाचा पुरवठा केला जातो.