नवी दिल्ली- बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट रेल्वेचा प्रकल्प वेगाने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्प लि. (एनएचएसआरसीएल) संस्थेने डिसेंबरअखेर बहुतांश जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ही बुलेट ट्रेन प्रति ताशी ३२० किमी वेगाने ५०८ किमी मार्गावर धावणार आहे.
एनएचएसआरसीएलचे प्रवक्ते सुषमा गौर म्हणाल्या, प्रकल्पाच्या कंत्राटाचे काम निश्चित केल्यानंतर जमीन घेण्यात येणार आहे. ही बुलेट ट्रेन प्रति ताशी ३२० किमी वेगाने मुंबई- अहमदाबाद हे अंतर २ तासात पूर्ण करणार आहे. सध्या हेच अंतर पूर्ण करण्यासाठी रेल्वेला सात तास लागतात. तर विमानाला २ तास लागतात. एनएचएसआरसीएलने लागणाऱ्या एकूण जमिनीपैकी ३९ टक्के म्हणजे १ हजार ३८० हेक्टर जमिनीचे संपादन केले आहे. यामध्ये गुजरातसह महाराष्ट्रातील जमिनीचा समावेश आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रगतीपथाने होत असल्याचे गौर यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन महिन्यांत ३३ टक्के जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यानंतर ९० दिवसांत ६ टक्के जमिनीचे संपादन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.