नाशकातील ओझरमध्ये कोरोनाचा शिरकाव, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - ओझर बातमी
नाशिकच्या ओझर येथे असलेल्या एच. ए. एल. कंपनी, रुग्णालय व एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिक -ओझरमधील एच. ए. एल. कंपनीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच एच. ए. एल. रुग्णालयातील कर्मचारी, अशा एकूण शंभरपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे ओझर शहरात दहशतीचे वतावरण पसरले आहे. तसेच खबदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने एच. ए. एल. रुग्णालय सील करण्यात आल आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये असलेल्या हिंदूस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीत कोरोनाने शिरकाव केला आहे. एच. ए. एल. कंपनी आणि रुग्णालयातील कर्मचारी बाधित आढळले आहेत. तसेच ओझर टाऊनशीपमध्ये असलेल्या एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू आहे.
दरम्यान, याठिकाणी काम करणारे कर्मचारी हे बाहेरून येत असल्याने त्यांची ने-आण करताना कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग तसेच प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात येत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.