नवी दिल्ली - मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला उद्यापासून कात्री लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोबाईलच्या वापराचा येणारा स्वस्ताईचा अनुभव संपणार आहे. भारती एअरटेल, व्होडाफोन आयडियाने रिचार्जचे दर ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचे जाहीर केले आहे. तर रिलायन्स जिओने रिचार्जचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे रविवारी जाहीर केले.
दूरसंचार कंपन्यांमधील तीव्र स्पर्धेमुळे गेल्या पाच वर्षात मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे दर वाढले नव्हते. २०१४ नंतर ग्राहकांना कॉलिंगचा दर जवळपास शून्य आहे. तर इंटरनेटच्या वापराचा दर २०१४ पासून ९५ टक्क्यांनी घसरला. २०१४ मध्ये एक जीबीसाठी २६९ रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी ग्राहकाला सध्या ११ रुपये ७८ पैसे मोजावे लागतात. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयिडियाने त्यांनी अमर्यादित श्रेणीतील नवे दर जाहीर केले आहेत. हे दर पूर्वीच्या प्रिपेड प्लॅनहून ५० टक्क्यापर्यंत अधिक आहेत. नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत. तर रिलायन्सने अर्मायिदत कॉलिंग आणि डाटाचे दर ४० टक्क्यापर्यंत वाढविले आहेत. हे नवे दर ६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत.
सर्वात प्रथम व्होडाफोन आयडियाने प्रिपेड उत्पादने आणि सेवांचे दर वाढविले. त्यापाठोपाठ भारती एअरटेलने प्रिपेड सेवांचे दर वाढविले आहेत. त्यामुळे भारती एअरटेल व व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना कॉलिंग करणे व इंटरनेट चार आठवडे चालू ठेवण्याकरिता किमान ४९ रुपयांचा प्रिपेड बॅलन्स असावा लागणार आहे. जिओनेही दर वाढविले आहे. मात्र, त्याचा ग्राहकांना ३०० पट फायदा होणार असल्याचा जिओने दावा केला आहे.
हेही वाचा-मोबाईल इंटरनेटसह कॉलिंग महागले! जिओकडून रिचार्जच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ
...तर आउटगोईंगसाठी मोजावे लागणार पैसे
व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलकडून अर्मयादित आउटगोईंगची सुविधा देण्यात येत होती. यावर ३ डिसेंबरपासून मर्यादा घालण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांनी २८ दिवसांच्या वैधतेसाठी प्लॅन असेल तर दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलसाठी १ हजार मिनिटांची मर्यादा निश्चित केली आहे. तर ८४ दिवसांच्या वैधतेचा प्लॅन असेल तर दुसऱ्या नेटवर्कवरील कॉलसाठी ३ हजार मिनिटांची मर्यादा घातलेली आहे. याचा अर्थ मर्यादेहून अधिक मिनिटे कॉलिंग केल्यास ग्राहकांना प्रति मिनिटे ६ पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. तर जिओने इतर नेटवर्कसाठी योग्य दर असणार असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्जचे दर २०१४ मध्ये वाढविले होते.