महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

देश सोडून जाणाऱ्या कोट्याधीशांच्या प्रमाणात वाढ; जीडब्ल्यूएमआर अहवाल - Brexit

गतवर्षी सुमारे ५ हजार कोट्याधीश देशातून निघून गेले आहेत. हे प्रमाण देशातील एकूण कोट्याधीशांच्या २ टक्के एवढे असल्याचे ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्हुव अहवालात (जीडब्ल्यूएमआर) म्हटले आहे.

प्रतिकात्मक

By

Published : May 12, 2019, 4:58 PM IST

नवी दिल्ली- उद्योगानुकलतेचे सुधारलेले मानांकन आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा सरकारकडून दावा केला जातो. असे असले तरी अनेक कोट्याधीश मोठ्या प्रमाणात भारत सोडून जात असल्याचे आकेडवारीतून समोर आले आहे.


देशातील कोट्याधीश लोक विदेशात निघून जाण्याचा प्रमाणात भारत गतवर्षी तिसऱ्या क्रमांकावर होता. गतवर्षी सुमारे ५ हजार कोट्याधीश देशातून निघून गेले आहेत. हे प्रमाण देशातील एकूण कोट्याधीशांच्या २ टक्के एवढे असल्याचे ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्हुव अहवालात (जीडब्ल्यूएमआर) म्हटले आहे. हा अहवाल आफ्रआशिया बँक आणि न्यू वर्ल्ड वेल्थ संशोधन संस्थेने प्रसिद्ध केला आहे.


ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर हा झाला इंग्लंडमध्ये बदल-
विशेष म्हणजे ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर इंग्लंडमधील कोट्याधीशांच्या होणाऱ्या स्थलांतरापेक्षा भारतामधील कोट्याधीशांच्या स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे. गेली ३० वर्षे विदेशातून येणाऱ्या श्रीमंतांचे सर्वात अधिक प्रमाण इंग्लंडमध्ये होते. मात्र ब्रेक्झिटच्या निर्णयानंतर हे प्रमाण गेल्या दोन वर्षात झपाट्याने घसरले आहे.

कोट्याधीशांनी देश सोडून जाण्याच्या प्रमाणत चीन पहिल्या क्रमांकावर -
कोट्याधीशांनी देश सोडून देण्याच्या प्रमाणत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. हा बदल चीन व अमेरिकेमधील व्यापारी युद्धानंतर झाला आहे. हे प्रमाण चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोट्य़ाधीशांनी देश सोडून जाण्याच्या प्रमाणात रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. मूळ देशातून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोट्याधीश जाण्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे.

देशातील कोट्याधीशांकडे देशातील एकूण ५० टक्के संपत्ती -
भारताच्या विकासदराचे असमान प्रमाण हा चिंताजनक विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशातील कोट्याधीशांकडे देशातील एकूण ५० टक्के संपत्ती आहे. येत्या १० वर्षात भारतामधील संपत्ती चांगल्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. २०२८ पर्यंत भारत हा इंग्लंड आणि जर्मनीहून अधिक संपत्ती निर्माण करेल, असेही जीडब्ल्यूएमआरच्या अहवालात म्हटले आहे. कोट्याधीश देश सोडून जात असले तरी नवे कोट्याधीश देशात तयार होत आहेत. त्यामुळे अमेरिका आणि चीनच्या दृष्टीने चिंतेची बाब नसल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details