नवी दिल्ली - घरगुती स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरचे दर आजपासून १ रुपया २३ पैशाने वाढले आहेत. तर बिगर अनुदानित सिलिंडर घेणाऱ्यांना २५ रुपयांची दरवाढ करण्यात करून सरकारने मोठा झटका दिला आहे.
राजधानीत अनुदानित सिलिंडरची किंमत ही ४९७ रुपये ३७ पैसे आहे. तर बिगर अनुदानित सिलिंडरची किंमत ही ७३७ रुपये ५० पैसे एवढी आहे.
सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने एलपीजी गॅसचे मासिक दर आज घोषित केले आहेत. घरगुती वापरासाठी ग्राहकांना १४.२ किलोचा अनुदानित सिलिंडर वापरता येतो. या अनुदानित सिलेंडरचे दर सरकारने सलग चौथ्यांदा वाढविले आले आहेत. सरकारकडून ग्राहकांना १२ सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येते. त्यामुळे १२ हून अधिक सिलिंडर घेणाऱ्यांना ग्राहकांना दरवाढीची मोठी झळ बसणार आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पेट्रोल -डिझेलचे दर नियंत्रणात होते. मात्र निवडणुकीच्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी १९ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढले आहेत.