नवी दिल्ली - महामारीच्या काळात देशभरात वैद्यकीय साधनांचा पुरवठा व्हावा, यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 'लाईफलाईन उडान' योजना सुरू केली आहे. या योजनेमधून देशभरात ५८७.५७ टन वैद्यकीय साधनांचा २२ एप्रिलपर्यंत पुरवठा करण्यात आला आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार लाईफलाईन उडान योजनेमधून ३३९ विमान उड्डाणे धाली आहेत. यामध्ये एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ आणि खासगी मालवाहू विमानांनी वाहतूक केली आहे. यामधील २०४ विमानांची उड्डाणे ही एअर इंडिया आणि अलायन्स एअरची असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ब्ल्यू डार्ट, स्पासईजेट आणि इंडिगोकडून व्यवसायिक पद्धतीने मालवाहू विमान वाहतूक सुरू आहे. लाईफलाईन उडाण योजनेत गुवाहाटी, दिब्रुगड, आगरतळा, आयझवल, दिमापूर, इंफाळ, कोईम्ब्तुर, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, रायपूर, रांची, पोर्ट ब्लेअर आणि गोवा या ठिकाणांना जोडण्यात आलेले आहे.