चेन्नई - एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. कंपनीने ५५ हजार कोटींचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. चालू वर्षात आजतागायत २६ हजार कोटींचे कर्ज वाटप केल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी दिली. ते २२ व्या मेगा प्रॉपर्टीच्या दोन दिवसीय कार्यक्रमात बोलत होते.
गतवर्षी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि. कंपनीने ४८ हजार कोटींचे कर्ज वाटप केले होते. सकल अनुत्पादक कर्ज (ग्रॉस एनपीए) हा कमी आण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची सिद्धार्थ मोहंती यांनी माहिती दिली. पुढे ते म्हणाले, सध्या सकल अनुत्पादक कर्ज हे २.३८ टक्के आहे. आम्ही एनपीबाबत काळजी घेत आहोत. कर्जाची वसुली करण्याकडे लक्ष देत आहोत. गतवर्षीच्या तुलनेत आम्हाला एनपीचे प्रमाण कमी हवे आहे. गेल्या वर्षी सकल अनुत्पादक कर्ज हे १.५४ टक्के होते.
स्थावर मालमत्ता क्षेत्रात हळूहळू सुधारणा होत आहे. तर परवडणाऱ्या दरातील घरांच्या प्रकारात चांगली सुधारणा झाली आहे. कंपनीच्या व्यवसायापैकी एकूण २६ टक्के व्यवसाय हा पंतप्रधान घरकूल योजनेतून होतो. या प्रकारामधील व्यवसाय वाढविण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. मालाच्या साठवणीसाठी गोदाम आणि ऑफिस कार्यालयांसाठीही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा-धक्कादायक! केवळ 'या' शहराचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित; सर्व महानगरे निकषात नापास
स्वत:च्या मालकीचे घर असावे, याकडे २५ ते ३५ वयोगटातील लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढली आहे. पूर्वी निवृत्तीनंतर घराचे नियोजन करण्यात येत होते. मात्र घर खरेदीत सवलती आणि सरकार उद्योगाला प्रोत्साहन देत असल्याने मालकीच्या घरांची मागणी वाढत आहे. घर खरेदीत तरुण हे निर्णय घेत आहे. हा बदल दिसत आहे. मोहंती म्हणाले, सामान्यत: २० वर्षांपर्यतच्या मुदतीचे गृहकर्ज देण्यात येते. मात्र, आम्ही ३० वर्षांच्या मुदतीचे कर्ज देतो. त्यामुळे कर्जाचा मासिक हप्ता कमी होतो.