महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एल अँड टी कंपनीही 'आत्मनिर्भर'; चिनी उत्पादनांबाबत 'हा' घेतला निर्णय - S N Subrahmanyan on china machines

एल अँड टीने प्रकल्पांमध्ये स्वदेशी कंपन्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या कंपनीने ही घोषणा केल्याने ही खूप महत्वाची बाब मानली जात आहे. एल अँड टीचे देशभरात 500हून अधिक प्रकल्प सुरू आहेत.

एल अँड टी
एल अँड टी

By

Published : Jun 23, 2020, 12:22 PM IST

मुंबई - भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादने तसेच चिनी कंपन्यांवर बहिष्कार घातला जात आहे. आता देशातील सर्वात मोठ्या आणि आघाडीच्या पायाभूत सुविधा विकासातील कंत्राटदार कंपनी अशी ओळख असलेल्या लार्सन अॅण्ड ट्युब्रो (एल अॅण्ड टी) कंपनीने 'आत्मनिर्भर'तेच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

एल अॅण्ड टीने यापुढे चिनी वस्तूंऐवजी अधिकाधिक स्वदेशी वस्तू वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चिनी कंपनन्यांऐवजी स्वदेशी कंपन्याबरोबर काम करण्याचा निर्णयही घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या कंपनीने ही घोषणा केल्याने ही खूप महत्त्वाची बाब मानली जात आहे.

एल अॅण्ड टीचे देशभरात 500हून अधिक प्रकल्प सुरू आहेत. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पाचा विचार करता अनेक महत्त्वाचे प्रकल्प हीच कंपनी राबवित आहे. शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेचा सर्वात महत्वाकांक्षी असा कोस्टल रोड प्रकल्प असो की, मेट्रो-3 वा शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू (एमटीएचएल) प्रकल्प एल अॅण्ड टी कडेच आहेत. तर कंपनीच्या अनेक प्रकल्पांत चिनी यंत्राचा व मशीनचा वापर केला जातो. तर काही प्रकल्पांत चिनी कंपन्याबरोबरही एल अॅण्ड टी काम करीत आहे. पण, यापुढे एल अॅण्ड टी ने आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन सुब्रमण्यन यांनी दिली आहे. भारत आणि चीनमधील तणाव वाढत असून आपल्या जवानांना वीरमरण येत आहे, हे दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशाबरोबर आहोत. त्यामुळेच आम्ही चीनवर अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतला आहे. शक्य तितक्या लवकर आम्ही 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरता आत्मनिर्भर भारत करण्याचे आवाहन केले होते. या आत्मनिर्भर भारतामधून विदेशातू आयात कमी करण्याचा उद्देश आहे. चीनवरील उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी अखिल भारतीय व्यापारी संघटनेने घेतली आहे. काही दिवसांपूर्वी चिनी बनावटीचा टीव्ही नागरिकांनी रस्त्यावर फोडलेला व्हीडिओ व्हायरल झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details