नवी दिल्ली - चीन-अमेरिकेमध्ये व्यापारी युद्ध सुरू आहे. सुरक्षेला धोका असल्याने अमेरिकेने हुवाईच्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. अशा स्थितीत हुवाईबाबतचा मुद्दा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ हे भारताच्या दौऱ्यामध्ये उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे समान पातळीवर भारताने हुवाईला ऑफर द्यावी, अशी हुवाईच्या कार्यकारी अधिकाऱ्याने अपेक्षा व्यक्त केली आहे.
देशात यंदा ५ जीसाठी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये केंद्रीय दूरसंचार विभाग हुवाईला सहभागी करून घेण्याबाबत साशंकता आहे. हुवाई इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय शेन म्हणाले, भारताने दबावाखाली चुकीचा निर्णय घेवू नये. जगाबरोबर खुला आणि सहकार्याचा दृष्टीकोन भारताने कायम ठेवावा. आगामी दहा वर्षे भारताला प्रगतीसाठी सोन्यासारखी ठरू शकतात. भारताने २०२५ पर्यंत १ लाख कोटी डिजीटल अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळवावी, असेही शेन म्हणाले.