जम्मू- जम्मू आणि काश्मीर सरकारने राज्यातील आयटी सेवा क्षेत्राचा विकास करण्यासाठी टाटा कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्याच्या राज्यपालांचे सल्लागार के. स्कंदन यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची मुंबईत भेट घेतली.
जम्मू-काश्मीर सरकार आयटी सेवा क्षेत्राचा विकास करण्यासाठी टाटांची मदत घेणार - के.चंद्रशेखर
जम्मू आणि काश्मीर सरकारने राज्यातील आयटी सेवा क्षेत्राचा विकास करण्यासाठी टाटा कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्याच्या राज्यपालांचे सल्लागार के. स्कंदन यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची मुंबईत भेट घेतली.
एन. चंद्रशेखरन यांच्याभेटीवेळी काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू तलत अहमद, राज्याचे आयटी सचिव सौगात विश्वास आणि जम्मू आणि काश्मीरच्या औद्योगिक विकासाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र कुमार हे उपस्थित होते.
आयटी क्षेत्रासाठी लागणाऱ्या कौशल्याबाबत चंद्रशेखरन यांनी चर्चा केली. तसेच उद्योग आणि पर्यटन क्षेत्र, हस्तकला, विणकाम आणि हॉर्टिकल्चरल क्षेत्राची प्रगती करून स्थानिक उत्पादनांची मागणी वाढण्यासाठी चर्चा केली.विद्यापीठ तसेच शैक्षणिक संस्थामधून आयटी क्षेत्राला लागणारे कौशल्य विकसित करण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञान क्षेत्रात स्थानिकांच्या कार्यक्षमतेला संधी मिळण्यासाठी ही भेट महत्त्वाची होती.
जिल्हापातळीवर बीपीओ सुरू करून स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी विनंती जम्मू आणि काश्मीर सरकारकडून करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची टीम जम्मू आणि काश्मीरमध्ये भेट देईल, असे आश्वासन चंद्रशेखरन यांनी स्कंदन यांना दिले. जम्मू आणि काश्मिरमध्ये संस्थात्मक पातळीवर आयटी कौशल्य विकसित करण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन चंद्रशेखरन यांनी दिले आहे.