नवी दिल्ली –भारतीय वर्तमानपत्र आणि माध्यमांच्या वेबसाईटवर निर्बंध लागू केल्याने इंडियन न्यूजपेपर सोसायटीने (आयएनएस) चीनवर टीका केली आहे. देशातही चिनी माध्यमांवरही निर्बंध लागू करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी आयएनएसने केंद्र सरकारला विनंती केली आहे.
आयएनएसचे अध्यक्ष शैलेश गुप्ता म्हणाले, की चीनने व्हीपीएननेही (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) भारताच्या माध्यमांवर निर्बंध लादले आहे. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञान असलेल्या फायरवॉलचा वापर केला आहे.
देशातील चीनच्या सर्व माध्यमांवर सरकारने बंदी लागू करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, अशी गुप्ता यांनी सरकारला विनंती केली आहे. चीनमधून देशातील माध्यमात होणारी गुंतवणूक व भागीदारी तातडीने बंद कराव्यात, अशीही आयएनएस अध्यक्षांनी सरकारला विनंती केली आहे.
भारताने सोमवारी 59 चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे. यामध्ये लोकप्रिय ठरलेल्या टिकटॉक आणि युसी ब्राऊझरचाही समावेश आहे. चिनी अॅपने देशाच्या सार्वभौमत्व, एकता व संरक्षणाला धोका असल्याचे सरकारने बंदी लागू केलेल्या आदेशात म्हटले होते.
दरम्यान, पूर्व लडाखमधील सीमारेषेवर चीन आणि भारतात तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर आयएनएसने चिनी माध्यमांबाबत भूमिका मांडली आहे.