नवी दिल्ली- प्रकाशोत्सव असलेली दिवाळी साजरा करताना पणत्यांची खरेदी आवर्जून केली जाते. या सणानिमित्त चांगली मिळकत होईल, अशी कुंभारकाम करणाऱ्या व्यवसायिकांची अपेक्षा फोल ठरली आहे. हे चित्र दिल्लीमधील दिसून येत आहे.
राजधानीमधील उत्तम नगरमध्ये अरुंद बोळीत कुंभार वस्ती आहे. येथे अनेक मातीपासून तयार केलेल्या वस्तू विक्रीला ठेवण्यात येतात. अनेक कुंभार व्यावसायिकांच्या पिढ्या पश्चिम दिल्लीत राहतात. दिवाळीमुळे व्यवसाय चांगला होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.
तिसऱ्या पिढीमधील कुंभार व्यवसाय असणारे हरी ओम यांनी महागाईमुळे कमी व्यवसाय झाल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले, पणत्यांच्या किमती वाढल्या आहेत. ग्राहक हे स्वस्त असलेल्या चिनी पणत्यांची खरेदी करत आहेत. दिवाळी आणि होळीमध्ये आमचा चांगला व्यवसाय होतो. मात्र, यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत 40 टक्के घसरण झाली आहे. त्यांनी 2 हजार पणत्यांची ऑर्डर मिळाल्याचे सांगितले.