नवी दिल्ली -देशात तेलइंधनाच्या मागणीत फेब्रुवारीत ३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मोफत स्वयंपाकाच्या गॅस जोडणी दिल्याने व पेट्रोल-डिझेलची मागणी वाढल्याने इंधनाची मागणी वाढली आहे. निवडणुकीच्या तोंडावर वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने पेट्रोल-डिझेलचा आणखी वापर वाढणार आहे.
फेब्रुवारीत १७.४१ मिलियन टन तेलइंधन खर्ची झाले आहे. गतवर्षी फेब्रुवारीत १६.७७ मिलियन टन तेलइंधन खर्ची झाले होते. ही आकडेवारी तेलमंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण विभागाने (पीपीएसी) दिली आहे. सलग तीन महिने इंधनाची देशात मागणी वाढली आहे. पेट्रोलची ८ टक्के मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने प्रत्येक घरात गॅस जोडणी देण्यासाठी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून स्वयंपाकाच्या गॅसची १४.२ टक्के मागणी वाढली आहे. डिझेलची इंधन म्हणून देशात सर्वात अधिक मागणी असते. फेब्रुवारीत डिझेलच्या मागणीत २.७ टक्के वाढ झाली आहे.