नवी दिल्ली– देशात टाळेबंदी -1 खुली होताना इंधनाच्या मागणीतही वाढ होत आहे. कोरोनाच्या संकटापूर्वी देशात जेवढी इंधनाची मागणी होती, त्यापैकी 80 ते 85 टक्के मागणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झाली आहे. ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वेबिनारमध्ये उद्योजकांशी बोलताना दिली.
टाळेबंदी शिथील झाल्याचा परिणाम; इंधनाच्या मागणीत देशात वाढ
भारत हा खनिज तेलाची खरेदी करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र, सध्या देशाची खनिज तेल खरेदी ही वर्ष 2007 हून कमी झाली आहे.
भारत हा खनिज तेलाची खरेदी करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मात्र, सध्या देशाची खनिज तेल खरेदी ही वर्ष 2007 हून कमी झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात टाळेबंदी लागू केल्याने खनिज तेलाची 70 टक्के मागणी कमी झाली होती. मात्र, टाळेबंदीचे नियम शिथील केल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासून खनिज तेलाची मागणी वाढत आहे.
- मे महिन्यातील खनिज तेलाच्या वापराचे प्रमाण हे एप्रिलहून 47.4 टक्के जास्त होते.
- एप्रिलमधील खनिज तेलाच्या वापराचे प्रमाण हे गतवर्षीच्या एप्रिलहून 23.3 टक्के कमी होते.
- मे महिन्यातील पेट्रोलच्या वापराचे प्रमाण हे 35.3 टक्क्यांनी कमी झाले होते.
विमान प्रवासांवर निर्बंध लागू केल्याने विमान इंधनाची घाऊक विक्री जवळपास शून्य होती. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात विमान इंधनाची मागणी ही गतवर्षीच्या जूनहून 73 टक्के कमी राहिली आहे. पेट्रोल व डिझेलची विक्री घसरली असली तर एलपीजीच्या विक्रीत 7 टक्के वाढ झाली आहे. पूर्वीच्या अंदाजाप्रमाणे इंधनाची मागणी वाढण्यासाठी दोन वर्षे लागणार असल्याचे वेबिनारमध्ये बोलताना इंडियन ऑईल कंपनीचे चेअरमन संजीव सिंह यांनी सांगितले.