नवी दिल्ली- देशातील इंधनाची मागणी फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच सणामुळे ऑक्टोबरमध्ये वाढली आहे. कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे देशातील इंधनाच्या मागणीत घसरण झाली होती.
पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये २.५ टक्क्यांनी वाढ होऊन १७.७७ दशलक्ष टन एवढी झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये १७.३४ दशलक्ष टन एवढे पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीचे प्रमाण होते. ही माहिती तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम व्यवस्थापन आणि विश्लेषण सेलने दिली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वापराचे प्रमाण कोरोनापूर्वीच्या स्थितीत-
कोरोनाच्या पूर्वीच्या स्थितसारखीच सप्टेंबरमध्ये पेट्रोलची मागणी वाढली आहे. तर डिझेलची मागणी ही ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या पूर्वीच्या स्थिती सारखी झाली आहे. डिझेलची मागणी ७.४ टक्क्यांनी वाढून ६.५ दशलक्ष टनपर्यंत पोहोचली आहे. तर पेट्रोलची विक्री ४.५ टक्क्यांनी वाढून २.५४ दशलक्ष टनपर्यंत पोहोचली आहे. डिझेलच्या वापराचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये वर्षभरात सर्वाधिक राहिले आहे.