वॉशिंग्टन(डी.सी.) - अमेरिकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण येत्या एप्रिल महिन्यापासून अमेरिकन व्हिसासाठी भारतीयांना अतिरिक्त 50 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये इन्व्हेस्टर व्हिसाचा समावेश असणार आहे.
अमेरिकन डेली बझारच्या माहितीनुसार या वाढीव टॅक्समुळे गुंतवणुकदार प्रभावित होणार आहेत. तसेच विविध प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱयांना अमेरिका प्रशासनच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. ईबी इन्व्हेस्टर व्हिसा प्रोग्रॅमसाठी यापुढे 900,000 अमेरिकन डॉलर्सची किमान गुंतवणूक करण्याची अट लागू होणार आहे. 1990 पासून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या किमान किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
किमान गुंतवणुकीच्या वाढलेल्या आकड्यावर नवीन 5 टक्के अतिरिक्त कर लागणार आहे. याची किंमत 50 हजार अमेरिकन डॉलर्स असून अर्जदारांना अन्य निकषांची देखील पूर्तता करावी लागणार आहे. अमेरिकेतील एस्क्रो खात्यात रक्कम ट्रान्सफर करताना या कराची रक्कम अदा करावी लागणार आहे.
नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीवर आले होते. यानंतर लगेच अशा प्रकारचा नियम लागू झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
भारतीयांनी अमेरिकेत जाण्यापूर्वी या ठिकाणच्या वाढलेल्या कर स्थितीची काळजीपूर्वक माहिती घेऊन नंतरच योजना आखावी, असे आवाहन डेव्हीस अॅन्ड असो. चे संचालक मार्क डेव्हीस यांनी केले आहे. स्थलांतर करणाऱया ज्या लोकांना हा कर भरायचा नाही. तसेच या पैशाचे स्रोत सांगायचे नसल्यास यासंबंधी नवीन नियमावली लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.