नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी परिवर्तन व्हावे, अशी अपेक्षा उद्योगपती आदि गोदरेज, अनिल अग्रवाल आणि उदय कोटक यांनी व्यक्त केली.
महिला आणि तरुण हे भारताचे भवितव्य घडवतील, असा विश्वास महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केला.
वेदांत रिसोर्सेचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले, लोकशाहीचा विजय झाल्याचा आनंद आहे. ज्यांनी विकासासाठी मतदान केले त्यांचे अभिनंदन! मोदींनी विकासासाठी नवे पाऊल उचलले आहे. त्यांच्या व्हिजनमुळे विकासाची नवी सुरुवात होणार आहे.
बँकर उदय कोटक म्हणाले, देशात परिवर्तनाची आणि खूप मोठ्या बदलाची वेळ आली आहे. भारताने महाशक्ती व्हावे, हे माझे स्वप्न आहे. नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएचे मन:पूर्वक अभिनंदन!
भारताचे सकल उत्पन्न (जीडीपी) वाढण्यासाठी नव्या सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित आहे, असे गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदि गोदरेज म्हणाले. कॉर्पोरेट कराबाबत गोदरेज म्हणाले, जगात सर्वात अधिक भारतात कॉर्पोरेट कर आहे. हा कर २५ टक्क्यापर्यंत कमी करण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. छोट्या कंपन्यांबाबत त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. मात्र मोठ्या कंपन्याबाबत हा निर्णय लागू झाला नाही. यासह इतर महत्त्वाचे पावले विकासासाठी उचलावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पंगारिया यांनीही धाडसी सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. तसेच संपूर्ण देशात परिवर्तन व्हावे, असे त्यांनी ट्विट केले. व्यवसायासाठी आणि नवउद्योजकांसाठी पोषक वातावरण व्हावे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबई शेअर बाजाराचे सदस्य रमेश दमानी म्हणाले, सरकारचे हेच धोरण सुरू राहिले तर विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल. केंद्रात स्थिर सरकार स्थापन होईल, असा विश्वास हाऊस ऑफ हिरानंदानीचे संस्थापक आणि संचालक सुरेंद्र हिरानंदानी यांनी व्यक्त केला. स्थिर सरकारमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विकासाला चालना मिळेल. नवे सरकार हे गुंतवणूक, विकास आणि रोजगार निर्मिती वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल, अशी आशा हिरानंदानी यांनी व्यक्त केली.