नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 5 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज एस अँड पी या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात आहे, याकडेही संस्थेने लक्ष वेधले आहे.
कोरोना संसर्गाच वाढते प्रमाण तसेच वित्तीय क्षेत्रासह काही क्षेत्रांत वाढणारे धोके या कारणांनी देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षात 5 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज एस अँड पीचा आहे.
आशिया-पॅसिफिक प्रदेशात मंदीमुळे दोन वर्षांत 3 लाख कोटी डॉलरचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. या प्रदेशाची अर्थव्यवस्था 2020मध्ये 1.3 टक्क्याने घसरणार आहे. असे असले तरी या प्रदेशाचा 2021मध्ये विकासदर 6.9 टक्के होणार आहे.
एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जचे आशिया पॅसिफिकचे मुख्य अर्थतज्ज्ञ शौन राउचे म्हणाले, की कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी आशिया पॅसिफिकमधील देशांनी काही प्रमाणात यश मिळविले आहे. कोरोनाच्या संकटाने कमी गुंतवणूक, घसरलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचा मंदावलेला वेग आणि अर्थव्यवस्थेवर कायमस्वरुपी परिणाम होणार आहे. कोरोनावरील लस सापडली तरी, हा परिणाम होणार, असे त्यांनी म्हटले.
कोरोनाची टांगती तलवार असल्याने बँका नेहमीप्रमाणे कर्ज न देता वसुलीकडे लक्ष केंद्रित करू शकतात. तर खासगी कंपन्यांकडून नवा खर्च व गुंतवणूक करण्यासाठी कर्जाचे प्रमाण स्थिर ठेवण्याला प्राधान्य दिल जाऊ शकते. मागणीत सुधारणा झाली तरी असे घडू शकते. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर हा चालू आर्थिक वर्षात 1.2 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर पुढील आर्थिक वर्षात विकासदर हा 7.4 टक्के राहिल, असा अंदाज पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे.
यापूर्वी फिच, मूडीज, आयएमएफ या संस्थांनीही देशाच्या विकासदराला यंदा मोठा फटका बसणार असल्याचे म्हटले आहे.