नवी दिल्ली - अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आखेर भारतानेही अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या उत्पादनांवरील आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अमेरिकेच्या २९ उत्पादनांवरील आयात शुल्क १६ जूनपासून वाढविण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रकही केंद्रीय वित्तमंत्रालयाने शुक्रवारी काढले.
भारताने आयात शुल्क वाढविल्याने अमेरिकेतील निर्यातदारांना फटका बसणार आहे. त्यांना भारतात निर्यात करताना अधिक आयात शुल्क भरावे लागणार असल्याने त्यांच्या उत्पादनांची भारतीय बाजारातील किंमत वाढणार आहे. यातून भारताला २१७ दशलक्ष डॉलरचे महसुली उत्पन्न मिळणार आहे.
या वस्तुंवरील आयात शुल्कवाढणार-
आयात शुल्क वाढविण्याच्या निर्णयाबाबत भारताने अमेरिकेला माहिती दिली आहे. अक्रोडवरील आयात शुल्क ३० टक्क्यांवरून १२० टक्के करण्यात येणार आहे. तर चना आणि मसूर दाळीवरील आयात शुल्क ३० टक्क्यावरून ७० टक्के होणार आहे. मसूरवरील शुल्क हे ४० टक्क्यापर्यंत वाढणार आहे. तर बोरिक अॅसिडसारख्या वस्तुवरील शुल्क हे ७.५ टक्क्याने वाढणार आहे. लोखंड आणि स्टीलची उत्पादने, सफरचंद, तांबे, संमिश्र स्टील, पाईप फिटिंग्ज, स्क्रूज, बोल्टस यांवरीलह आयात शुल्क वाढणार आहे.
भारताचा चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न-
अमेरिकेने भारतामधून आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनिअम उत्पादनांवर शुल्क वाढविले होते. त्यानंतर केंद्र सरकारने २१ जून २०१८ ला अमेरिकेच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेने व्यापार प्राधान्यक्रमाच्या यादीतून भारताला ५ जूनपासून वगळले आहे. मात्र चर्चेतून व्यापारी वादावर तोडगा काढण्याचे धोरण स्वीकारत भारताने आयात शुल्क वाढीचा निर्णय लांबणीवर टाकला होता. स्टील आणि अॅल्युमिनिअमवर आयात शुल्क वाढविल्याने भारताने अमेरिकेला जागतिक व्यापारी संस्थेच्या वाद निवारण यंत्रणेत खेचले आहे.