नवी दिल्ली– टाळेबंदी लागू असताना एप्रिल-जूनमध्ये देशात आयात होणाऱ्या स्मार्टफोनचे प्रमाण हे 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. येत्या सणासुदीमुळे चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत स्मार्टफोनची बाजारपेठ सावरेल, असा बाजारपेठ संशोधन संस्थेने अंदाज केला.
आयडीसी या बाजारपेठेचे संशोधन करणाऱ्या संस्थेने स्मार्टफोनच्या बाजारपेठेविषयी अहवाल तयार केला आहे. देशाच्या स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंगचा सर्वाधिक 24 टक्के हिस्सा आहे. तर त्यापाठोपाठ शाओमी, विवोचा स्मार्टफोनच्या बाजारपेठेत हिस्सा असल्याचे आयडीसीने अहवालात म्हटले आहे. गतर्षीच्या तुलने दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनच्या बाजारपेठेत 50.6 टक्क्यांची घसरण झाली आहे. देशात टाळेबंदी लागू केल्याने ही घसरण झाली आहे.
स्मार्टफोनच्या विक्रीत शाओमी अव्वल-
विक्रीत घसरण झाली असताना स्मार्टफोनच्या विक्रीत शाओमीने एप्रिल-ते जूनच्या तिमाहीत पहिला क्रमांक कायम टिकविला आहे. शाओमीचा स्मार्टफोनच्या विक्रीत 29.4 टक्के हिस्सा राहिला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सॅमसंगचा 26.3 टक्के, विवोचा 17.5 टक्के, रिअलमीचा 9.8 टक्के आणि ओप्पोचा 9.7 टक्के एवढा स्मार्टफोनच्या बाजारपेठेत हिस्सा राहिला आहे.
दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला विस्कळित झालेल्या पुरवठा साखळीमुळे कंपन्यांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. टाळेबंदी काढल्यानंतरही पूर्ण तिमाहीत कंपन्यांकडून उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू झाले नाही.
चीनमधून आयात येणाऱ्या स्मार्टफोनच्या सुट्ट्या भागांची सीमा शुल्काकडून कठोरपणे तपासणी केली जात आहे. अॅपल आयफोन 11 आणि आयफोन एक्सआरचा एकूण मोबाईलच्या आयातीत 28 टक्के हिस्सा राहिला आहे.