नवी दिल्ली- केंद्र सरकारने जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्याची दोन महिन्यांनी मुदतवाढ दिली आहे. जीएसटी नोंदणी करणाऱ्यांना आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे जीएसटीचे विवरणपत्र ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही मुदतवाढ दिली होती.
जीएसटी वार्षिक विवरणपत्र (जीएसटीआर-९) आणि जीएसटीआर-९ सी हे विवरणपत्र भरण्याकरता मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि उत्पादन शुल्काने (सीबीआयसी) जाहीर केला आहे.
कोरोनाने उद्योगांवर परिणाम-
कोरोना महामारी आणि टाळेबंदीच्या नियमांमुळे व्यवसाय सुरळितपणे चालू शकले नाहीत. तर देशाच्या काही भागात अद्यापही व्यववसाय सुरू झाले नाहीत. त्यामुळे जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्याची सीबीआयसीकडे विविध उद्योगांनी विनंती केली होती. या स्थितीचा विचार करता जीएसटी समितीने जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सी हे विवरणपत्र भरण्यासाठी ३१ ऑक्टोबरहून ३१ डिसेंबर २०२० मुदतवाढ देण्याला संमती दिली आहे.