नवी दिल्ली - कोरोना महामारीचा आणि देशभरातील टाळेबंदीचा भारतातील नोकरभरतीवर मोठा परिणाम झाला आहे. नोकरभरतीत सलग दुसऱ्या महिन्यात 60 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याचे नोकरी डॉट कॉम या कंपनीने म्हटले आहे.
नोकरभरती ही उपहारगृहे, हॉटेल, प्रवास आणि विमान क्षेत्रात 91 टक्क्यांनी घसरली आहे. तर किरकोळ विक्री क्षेत्रात 87 टक्के, ऑटो क्षेत्रात 76 टक्के घसरण झाली आहे. नोकरी डॉट कॉम या कंपनीचे मुख्य व्यवसाय अधिकारी पवन गोयल म्हणाले की, टाळेबंदी ही वाढल्याने सलग तिसऱ्या महिन्यात नोकरभरतीची प्रक्रिया थंडावली आहे.
कंपनीने घेतलेल्या सर्वेक्षणात 39 टक्के एचआर प्रमुखांनी आवश्यतेप्रमाणे नोकरभरती सुरू असल्याचे सांगितले. यामध्ये औषधनिर्मिती, आरोग्य विमा, आयटी या क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे. कोलकात्यात 68 टक्के, दिल्लीत 67 टक्के आणि मुंबईमध्ये 67 टक्के नोकरी भरतीचे प्रमाण कमी झाले आहे. नुकतेच नोकरी डॉट कॉमने केलेल्या सर्वक्षणानुसार दहापैकी एका भारतीयाने नोकरी गेल्याचे सांगितले होते. तर दहापैकी तीन जणांना नोकरी जाण्याची भीती वाटत होती.
दरम्यान, टाळेबंदी असल्यामुळे ओला, उबेर अशा अनेक कंपन्यांनी कर्मचारीकपात केली आहे.